Tuesday 22 September 2015

गॉड ऑफ स्मॉल थिंग्झ

https://critperspective.files.wordpress.com/2011/12/the-god-of-small-things1.jpg
सामान्यत: आपण आपल्याला ज्या लेखकांचे विचार पटतात अशा लेखकांची (लेखक हा शब्द स्त्री आणि पुरूष लेखक या दोघांसाठी एकच वापरला आहे) पुस्तके वाचतो. ज्यांचे लेखन अधिक भावते अशांची पुस्तके अधिकाधिक वाचली जातात. माझ्या आयुष्यातील एक काळ असा होता की मी फक्त विशीष्ट प्रकारचीच पुस्तके वाचत होते. अचानक १२-१३ वर्षांपूर्वी असे जाणवले की आपण विविधांगी वाचायला पाहिजे. म्हणजे जे लेखक फारसे माहिती नाहीत त्यांची पुस्तके देखील वाचली पाहिजेत. त्याचप्रमाणे विविध विषयांवरील लेखन कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता वाचली पाहिजेत. गेल्या १२-१३ वर्षांत खूप विविध प्रकारचे, विविध विषयांवरचे लेखन वाचनात आले. शक्यतो वाचन करताना मी कोणताही राजकीय दृष्टिकोन ठेवत नाही. त्यामुळे वाचनात केवळ उजव्या विचार सरणीच्याच लेखकांचे वाचायचे आणि डाव्या विचारसरणीचे नाही असल्या भानगडी ठेवत नाही. कोणतंही पुस्तक वाचून झाल्यावर आपली सारासार विचार करण्याची शक्ती वापरून त्या पुस्तकाचं विश्लेषण करायचं हे ठरलेलं. हेच धोरण मी चित्रपट पाहताना ठेवते. त्यामुळे जसे मी कोणतेही पुस्तक वाचू शकते तसाच कोणताही चित्रपट पाहू शकते.

तसं अरुंधती रॉय हे नाव तिच्या "गॉड ऑफ स्मॉल थिंग्झ" या पहिल्याच (आणि शेवटच्याही म्हणू शकतो) कादंबरीला जगप्रसिद्ध आणि मानाचा बुकर पुरस्कार मिळाला तेव्हाच ऐकलं. त्यानंतर ही बाई ज्या ज्यावेळी राजकारणावर किंवा इतर गोष्टींवर बोलली, काही बाही लिहीलं त्यावेळी खरंच सांगते ती माझ्या डोक्यात गेली. म्हणून आत्ता आत्तापर्यंत मी तिचं ते "गॉड ऑफ स्मॉल थिंग्झ" कधीच वाचलं नव्हतं.....घरात पडलेलं होतं. साधारण पंधरा दिवसांपूर्वी मला माझ्या नवर्‍याने त्या पुस्तकाचं अपर्णा वेलणकर यांनी भाषांतर केलेलं मराठी पुस्तक भेट दिलं. माझ्या कपाळावरची आठी पाहून तो मला म्हणाला की अगं एक कथा म्हणून वाचून पहा. आणि मी ती वाचायला घेतली. ४४० पानांची भरगच्च कादंबरी एकदा हातात घेतली की सोडवत नाही. सध्या प्रचलित असलेला मधेच वर्तमान, मधेच भूतकाळ, मधेच त्यातील उप-उप कथानकं.....अशा स्टाईलमधे लिहीलेली असली तरी कथेचा गाभा कुठे सुटलाय असं आजीबात वाटत नाही. अधिकाधिक लेखक सुरुवातीला किंवा पुढे देखील आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातील अनुभव आणि पाहिलेली पात्रेच आपल्या लेखनात वापरतात. सुरूवातीलाच दिलेली अरुंधती रॉय यांची ओळख वाचल्यानंतर "गॉड ऑफ......" वाचताना सारखं असं वाटत रहातं की कथेचा अधिकांश भाग हा त्यांच्या आत्मकथनाचा आहे काय? असो.

लहान मुलांचं भावविश्व....(विशेषत: जुळयांचं भावविश्व) आणि त्यांच्यावर होणारा आजूबाजूच्या छोट्या छोट्या गोष्टींचा, प्रसंगांचा कायमस्वरूपी परिणाम हे या कादंबरीत प्रकर्षानं येतं. कथा छोटीशीच आहे पण ज्या प्रकारे ती रंगवली आहे त्याला तोड नाही. वर्तमान आणि भूतकाळांच्या कथानकं, उप कथानकं, उप-उप कथानकं यांचं अतिशय दाट जाळं विणलेलं असलं तरी कथेचा क्लायमॅक्स हा शेवटच्या काही पानांमधेच उलगडत जातो. पहिल्यापासून आपल्याला जो प्रश्न पडलेला असतो की या कादंबरीचं नाव "गॉड ऑफ स्मॉल थिंग्झ" का ठेवलंय याचं उत्तरही शेवटीच मिळतं. भाषा बरीच अश्लील आहे आणि अनेक प्रसंगांचे उत्तान वर्णन असले तरी कादंबरीच्या कथानकाला साजेसेच आहे. त्यामुळे त्यावरुन कादंबरी वाचूच नये असे मात्र ठरवू नये. मानवी अस्तित्व, नात्यांची भावनिक गुंतागुंत, सामजिक रूढी-परंपरा यात अडकलेलं मानवी जीवन, मानवी जीवनाचा मूळ हेतू, अश्रु, भय, दु:ख, तिरस्कार यासगळ्यांनी दाट विणलेले भावनिक, धार्मिक आणि सामाजिक पदर.....यातून दर्शन होते गॉड ऑफ स्मॉल थिंग्झ चं.  कादंबरी एक एक करत विविध भावनिक, धार्मिक, सामाजिक पदर उलगडत जाते. शेवट वाचताना डोळ्यात पाणी उभं रहातं हे नक्की.

मुलांचं भावविश्व आपण मोठ्यांनीच जपलं पाहिजे. त्यांच्याशी कुठे वाईट वर्तन होत नाहीये ना याची खात्री करून घेतली पाहिजे. मुलांमधे आणि आई-वडिलांमधे इतकं मायेचं आणि मित्रत्त्वाचं नातं असलं पाहिजे, विश्वासाचं नातं असलं पाहिजे की काहीही झालं तरी ते त्यांना आई-वडिलांना सांगता आलं पाहिजे. अजुन खूप काही आहे पण ती कादंबरी एकदा तरी जरूर वाचा इतकंच सुचवेन.