Wednesday 24 February 2010

कोमा

(डिस्क्लेमरः कथेतील पात्रं व प्रसंग पूर्णपणे काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी अथवा व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा.)
नलीला स्ट्रेचरवर घालून ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं. तिच्या पोटात अजुनही असह्य वेदना होत होत्या. डॉक्टरांनी तिला ऑपरेशन टेबलवर झोपवलं आणि सराईतपणे नलीशी बोलत एकीकडे सिस्टरला सूचना दिल्या. नलीला तिचे नेहमीचे कपडे बदलून हॉस्पिटलचा हिरवा अगदि टिपीकल गाऊन घालेपर्यंत वेदना चालूच होत्या. सिस्टरने तिचे कपडे बदलून तिला ऑपरेशन थिएटर मध्ये आणलं होतं. ऑपरेशन करून घेण्याची ही नलीची पहिलीच वेळ. डॉक्टर काय बोलत होत्या हे तिच्या डोक्यावरून जात होते. हातपाय गार पडत चालले होते. तशातच डॉक्टरांनी तिला सांगितलं, "काळजी करू नकोस, आता थोड्याच वेळात तुला बरं वाटायला लागेल, हं!!" नलीला आता कोणाचाच आवाज ऐकावासा वाटत नव्हता. नली आपल्याच कोणत्यातरी विचारात असताना सिस्टरनी चटकन एक इंजक्शन दिलं. डॉक्टर म्हणाल्या आता तुला काही त्रास होणार नाही. मग हळूच डॉक्टरांनी नलीचा उजवा हात हातात घेउन आय-व्ही टोचलं. नलीला आता फक्त त्यांचे पुसट होत जाणारे आवाज ऐकू येत होते आणि आजूबाजूला होणार्‍या हालचालीची पुसटशी जाणीव होत होती. त्यानंतर एकदम एअरटाईट कंपार्टमेंट मध्ये असल्या सारखं तिला वाटायला लागलं. तिने हलण्याचा प्रयत्न केला पण तिला हलताच येत नव्हते. आपल्या शरीराला काहीतरी होतं आहे याची जाणीव तिला होती पण डॉक्टर म्हणाल्या तसं तिला त्याचा त्रास होत नव्हता. खूप दमल्यावर अंगातली शक्ती पूर्णपणे निघून गेल्यावर जसं वाटेल तसंच तिला वाटत होतं. त्या एअरटाईट कंपार्टमेंट मध्ये ती कितीवेळ तरी पडून होती. मग अचानक तिला पुन्हा आजूबाजूचे आवाज ऐकू यायला लागले. पण ते तिला सहन होत नव्हते. त्यामधून बाहेर पडण्याचा तिचा अटोकाट प्रयत्न चालला होता. "आई...आई..ई..ई.." असं जीवाच्या आकांताने ओरडून ती पुन्हा शांत होत होती. पुन्हा १-२ मिनीटांनी तोच प्रकार. हे सगळं पहिल्यांदाच पहात असलेला अनिकेत, नलीचा नवरा, कावरा बावरा होउन नलीच्या उशाशी बसला होता. काही वेळाने नलीने अनिकेतला ओळखले आणि आता ती अनु....अनु असे ओरडायला लागली. तिच्या हळूहळू लक्षांत येत होतं की आता ती हॉस्पिटल मधल्या तिच्या प्रायव्हेट रूम मध्ये असून अनिकेत एका हाताने तिचा हात हातात घेउन तिला दुसर्‍या हाताने गोंजारत होता. तिच्या डोळ्यांतून निघणार्‍या पाण्याच्या धारा काही थांबायचं नाव घेत नव्हत्या. अंगातली सगळी शक्ती गेल्याने तिला फारसं बोलता येत नव्हतं. शरीर एकदम हलकं हलकं वाटत होतं. बराच वेळ तिला झोप लागली असावी. आता तिला थोडं बोलता येत होतं. पण डोळे आजुनही पाणावलेले होते. मधुनच तिला मळमळल्या सारखं होत होतं. खूप तहान पण लागली होती. पण डॉक्टरांनी सिस्टरला बजावलं होतं की त्या जो पर्यंत परत येउन पेशंटला तपासत नाहीत तोपर्यंत तरी तिला पाण्याचा एक थेंब सुधा द्यायचा नाही. एकीकडे तिच्या उजव्या मनगटापाशी टोचलेलं आय-व्ही तसच होतं. सिस्टरना डॉक्टरांनी सांगून ठेवलं होतं की सलाईनची आयत्यावेळी गरज पडली तर पुन्हा टोचाटोची टळण्यासाठी ते तसंच ठेवलं होतं. त्यामुळे नली तशीच अनिकेतच्या हातात हात देउन पडून राहिली.
..............
नली आडीच महिन्यांची गरोदर होती. सकाळीच घरी गडबडीत पाय घसरून ती पडली. त्यामुळे पोटात वेदना चालू झाल्या होत्या आणि ब्लिडिंग पण व्हायला सुरूवात झाली. नशीबाने अनिकेत ऑफिसला जायच्या आधीच हे झाल्याने त्याची मदत मिळाली. त्यानेच मग बाबांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी डॉक्टरांना ताबडतोब इमरर्जन्सी कॉल दिला आणि डॉक्टरांनीही तासाभरात ऑपरेशनची जुळवाजुळव केली. खरंतर आज तिच्या आईचं वर्षश्राद्दं होतं. बरोब्बर एका वर्षांपूर्वी तिची आई कॅन्सरने गेली होती. तिला ते सगळं आठवायला लागलं. आई पण जेव्हा गेली तेव्हा कोमात होती. नलीच्या मनात आलं, "खरंच, आत्ता आपण जे काही अनुभवलं आईने जी दोन महिने कोमात मरणाशी झुंज दिली त्या दरम्यान पण असंच घडलं असेल कां? नलीला आता पुन्हा तो सगळा काळ आठवला.
तिची आई जाण्याच्या आधी एक वर्ष तिला कॅन्सर झाल्याचं निदान झालं होतं. अचानक असं काही होईल हे ध्यानीमनी नसल्याने घरातले सगळेच हादरले होते. तिसरी स्टेज असल्याने डॉक्टरांनी फक्तं सहाच महीने सांगितले. मग त्यातच होणारा त्रास कमी करण्यासाठी की वाढवण्यासाठी ती केमोथेरपी चालू झाली. त्यामुळे तिच्या शरिरात खूप मोठी आग पडल्यासारखं तिला वाटायचं. कालांतराने तिच्या डोक्यावरचे केस पण गायब झाले. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सगळं चालू होतं. तसे तिने सहा महिन्यांच्या वर काढले. तिची प्रतिकारशक्ती खूपच कमी झाली होती. त्यामुळे कफ, खोकला तिला अगदी नेहमीचाच असे. एक दिवस खोकल्याची मोठी उबळ तिला आली. नलीचे वडील तिथेच होते. त्यांनी तिला पाणि देण्याचा प्रयत्न केला पण कफ तिच्या श्वासनलिकेत जाउन तिचा श्वास अडकला. कसा तरी तोंडाने श्वासोछ्वास चालू होता. डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलं. त्यांनी तिला तपासलं आणि म्हणाले, "त्या कधी शुध्धीवर येतील ते काही सांगता येत नाही. कदाचीत २-३ दिवस लागतील किंवा जास्तं दिवसही लागतील. किंवा त्या कधी शुध्धीवर न येता जातील सुधा. पण किती दिवस लागतील ते सांगता येत नाही." नली ने आईच्या चेहर्‍याकडे पाहिले. तिचा चेहरा अजुनही वेडावाकडा होत होता..फीट आल्यावर एखाद्याचा होतो तसा. डॉक्टर रोज सकाळ संध्याकाळ इंजक्शन देउन जात होते. पण उपयोग काही होत नव्हता. त्यातून डॉक्टरांनीच सांगितलं की हॉस्पिटल मध्ये हलवून उपयोग नाही. कारण तिचं शरीर एकतर त्या कॅन्सरने पोखरलं गेलं होतं आणि हॉस्पिटल मध्ये फक्त आय. सी. यू. मध्ये सगळ्या शरीराला नळ्या लावून ठेवणार. त्यात त्या पेशंटवर नक्की काय उपचार चालू आहेत ते कळायला पण मार्ग नसे. त्यामुळे काय होतं आहे आणि कधी होतं आहे याची वाट बघत बसण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. जस जसं लोकाना-नातेवाईकांना समजत होतं तस तसं ते भेटायला येत होते. त्यांचे हेतू जरी चांगले असले तरी घरात पेशंट असल्यावर त्या घरात किती वेळ बसावे आणि काय बोलावे याचं भानच लोकांना नसायचं. या सगळ्याचा त्रास नली आणि तिच्या वडिलांना होत असे. तिच्या आईचे डोळे उघडे असत आणि घशांतून घर घर येत होती. हे सगळं रात्रंदिवस चालू होतं.
या सगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे लोक वेगवेगळे सल्ले देत होते. त्यातच कोणी तरी तिला सांगितलं की कोमा मध्ये माणूस असला तरी त्याला सगळं बोलणं ऐकायला येत असतं. कोणी सांगितलं की नलीच्या चिंतेमुळे तिच्या आईचा प्राण अडकून राहीला आहे. मग नलीने रोज रामरक्षा, मनाचे श्लोक, करूणाष्टकं हे सगळं आईच्या जवळ जाउन म्हणायला सुरूवात केली आणि उरलेला वेळ भग्वदगीता तसेच ओंकार जप यांच्या कॅसेट्स लावलेल्या असायच्या. शक्यतो तिच्या आजूबाजूला कोणी येउन काहीबाही बोलणार नाही याची खबरदारी घेतली जायची. जवळ जवळ दोन महिने असे काढले. एक दिवशी अनिकेत आला. तो तसा नेहमीच यायचा. पण त्यादिवशी त्याने जे केले त्यामुळे नलीचा कोमात असलेल्या व्यक्तींना आवाज ऐकू येतात यावर विश्वास बसला. अनिकेतने त्या दिवशी नलीचा हात हातात घेउन आईच्या काना जवळ जावून तिला सांगितलं की नलीची काळजी करू नका. मी तिची आणि तिच्या बाबांची काळजी घेइन. काय आश्चर्य, आई च्या घशातली घरघर थांबली आणि त्याच दिवशी रात्री तीने शांतमनाने आपला दोन महिने मॄत्यूशी चालू असलेला संघर्ष थांबवला.
आज काय योगायोग घडला होता. नलीने पण काहीप्रमाणात आईची स्थिती अनुभवली होती. आणि अनिकेतने त्याचं तिच्या आईला दिलेलं वचन पण पाळलं होतं.

बदल हाच कायम आहे!!

आडीच वर्षांपूर्वी मी मुंबई मध्ये नोकरी साठी गेले आणि एका वर्षाच्या आंत (साधारण १० महिन्यांनी) मला बंगलोर येथे संशोधनाची संधी मिळाली. मुंबई सारख्या ठिकाणी जागा मिळणं तसं मुश्किलच. पण मला पाच महिन्यांनी (एक महिना पेईंग गेस्ट, एक महिना एका नातेवाईकांकडे, तीन महिने दुसरया नातेवाईकांकडे) एक जागा मिळाली. या सगळ्या काळात माझ्या office मधील सहकार्यांनी माझी सगळी धावपळ बघीतली होती. (म्हणजे सुरुवातीला गोरेगाव ते सांताक्रुझ -अंधेरी........प्रचंड गर्दीत आणि लोकल मध्ये लटकून, नंतर, पनवेल ते अंधेरी......दोन्ही शेवटची स्थानके म्हणून बसून प्रवास......पण जाणे-येणे मिळून तीन तास, सायन ते दादर-सांताक्रुझ-जुहु जाणे-येणे मिळून दोन तास, शेवटची जागा मुलुंड मध्ये..........म्हणजे दोन लोकल्स बदलणे......आणि हे सगळं office hours मध्ये.) माझी तर हालतच झाली होती जरी हा सगळा प्रवास पहिल्या वर्गाच्या डब्यांतून होत असला तरी. रोज परतीच्या प्रवासात परमेश्वराची प्रार्थना करत असे या सगळ्यांतून सुटका व्हावी आणि जरा कमी धावपळीच्या ठिकाणी नोकरी मिळावी. दहाव्या महिन्यांत परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. माझ्या बंगलोरच्या संधी विषयी आणि शिफ्टिंग करण्या संबंधी सांगितल्यावर एका सहकारयाने मला एक काळजीने प्रश्न विचारला........settle कधी होणार?? मी माझ्याच भूतकाळात डोकावले...........खरंच तळपायावर चक्रं असल्या सारखं किंवा पायाला भिंगरी लावल्या सारखी मी शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने देशभर आणि परदेशात हिंडले. तरी लोकमान्य अशा व्याख्येत मी settled या प्रकारात मोडत नव्हते आणि आता सुध्धा मी त्या अर्थी settled नाही. (settled ची लोकमान्य व्याख्या म्हणजे: कायम स्वरूपाची नोकरी, कायम स्वरूपी घर इ.) पण मला तर त्यात काहिच विचीत्रं वाटत नाही. माझ्या मते settled असणे ही एक मानसिक अवस्था आहे शारिरीक किंवा भौतिक ही नाही.
या जगात सगळंच क्षणोक्षणी बदलत असतं. अगदि आपल्या शरिरातील पेशीसुधा बदलत असतात. जे आपण काही क्षणांपूर्वी असतो ते आपण काही क्षणांनंतर नसतो. हे सगळं इतकं सूक्ष्मरित्या चालू असतं की आपल्याला त्याची जाणीवसुधा होत नाही. वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा............. कायमस्वरूपी असं काहिच नाही. आपल्याला त्याची जाणीव नसते इतकंच. सगळ्याच जड वस्तुंमध्ये हे जडत्व (inertia) असते. सहजासहजी आपल्या स्थितीमधील बदल कोणीच स्विकारत नाही. म्हणून मानसिक त्रास होतो. जरा बदल झाला तरी बरयाच जणांना तो आवडत नाही. मग सर्व तक्रारी (मुख्यतः शारिरीक) चालू होतात. पण हेच बदल जर मानसिक द्दृष्ट्या स्विकारले तर मन स्थिर (settle) होतं. हे काही खूप अवघड आणि आध्यात्मिक आहे असं मला तरी वाटत नाही. फक्त समजून घ्यायला पाहिजे. यामुळे आपण जीवनाचा अधिक आनंद घेवू शकतो असं मला वाटतं.
असं विंचवाचे बिरहाड पाठीवर सारखी स्थिती असली की सामानही कमी रहाते..........म्हणजे गरजे पुरते....स्वछता आणि आवराआवरी करायलाही सोपे. जास्त संग्रह नसल्याने एखादी गोष्ट काम झाल्यावर फेकून देतांना त्रास होत नाही.........किंवा गोंधळही होत नाही........की काय फेकायचे आणि काय नाही ते. आपल्याला काय वाटतं या विषयी??

आदरणीय माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी हैदराबाद येथे दिलेल्या व्याख्यानाचे (काही भागाचे) मराठी भाषांतर:

आदरणीय माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांनी हैदराबाद येथे दिलेल्या व्याख्यानाचे (काही भागाचे) मराठी भाषांतर:
हे भाषण वाचण्यासाठी कृपया आपल्या अमूल्य वेळामधील १० मिनिटांचा वेळ जरूर काढावा हीच विनंती.
================================
आपल्याकडची प्रसारमाध्यमे एवढी नकारात्मक का असतात?
भारतामध्ये आपल्याला आपल्याच क्षमता आणि उपलब्धता ओळखण्यात कमीपणा कां वाटतो? आपला देश खूप महान आहे. आपल्याकडे कितीतरी आपली यशोगाथा सांगतील अश्या गोष्टी आहेत पण आपणच त्यांची दखल घेत नाही. असं कां?
दुग्ध व्यवसायात आपला जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक लागतो. आपण रिमोट सेन्सिंग उपग्रह तयार करण्यामध्ये सुद्धा प्रथम क्रमांकावर आहोत. गव्हाचे आणि तांदुळाचे उत्पादन यात जागतिक क्रमवारीत आपला द्वितीय क्रमांक लागतो. डॉ सुदर्शन यांच्या कडे बघा, त्यांनी एका आदिवासी खेड्याचे रूपांतर एका स्वबळावर आणि स्वयं प्रेरणेवर चालणाऱ्या चांगल्या गावात केलं आहे.
अश्या उपल्ब्धतांची आपल्याकडे लक्षावधी उदाहरणे आहेत पण प्रसार्माध्यामना फक्त वाईट बातम्या, अपयश आणि आपत्ती या सगळ्याचच आकर्षण आहे.
मी तेल अवीव मध्ये असताना तिथले वर्तमानपत्र वाचत होतो. त्याच्या आदल्याच दिवशी तिथे खूप बोंब हल्ले झाले होते आणि त्या हल्य्यात खूप व्यक्ती मरण पावल्या होत्या. ते हल्ले हमास या अतिरेकी संघटनेने केलेले होते. पण त्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर अश्या एका जू गृहस्थाच चित्र होतं कि ज्याने पाच वर्षांत वाळवंटात बाग फुलवून हिरवाई निर्माण केली होती. या प्रेरणादायी चित्राने सगळ्यांच्या दिवसाची सुरुवात त्या वृत्तपत्राने करून दिली होती. बोंब हल्ले आणि त्यात मेलेली माणसे, हल्ले कसे झाले त्याविषयीच्या कथा हे सगळे आतील पानांवर इतर बातम्यांमध्ये प्रकाशित केले होते.
भारतामध्ये आपण वृत्तपत्रांमध्ये रोज फक्त पहिल्या पानांवर मृत्यू, दहशतवाद, गुन्हे, आजारपणे अश्याच बातम्या वाचतो. आपण इतके नकारात्मक कां आहोत?

आजून एक प्रश्न: एक देश म्हणून आपल्याला कायम परदेशी वस्तूंचे आकर्षण कां आहे? आपल्याला परदेशातील टी व्ही हवेत, परदेशी कपडे हवेत. आपल्याला परदेशी तंत्रज्ञान हवे. एवढ्या आयात केलेल्या वस्तूंचे आपल्याला आकर्षण कां आहे? आपल्या हे लक्षात कसे येत नाही कि स्वाभिमान हा स्वयंपूर्णते मधून येत असतो. मी हैदराबाद मध्ये एक व्याख्यान देण्यासाठी गेलो असताना एका १४ वर्षांच्या मुलीने मला स्वाक्षरी मागितली. मी तिला तिच्या आयुष्यातील ध्येय विचारलं. टी उत्तरली: मला प्रगत भारतात राहायचं आहे. तिच्यासाठी तुम्हाला आणि मला प्रगत भारताची निर्मिती करायची आहे. तुम्ही घोषणा केलीच पाहिजे. भारत हा काही अप्रगत देश नाही, तर तो एक प्रगत देश आहे.
तुमच्या कडे १० मिनिटे आहेत? मला काही कटू सत्य घेऊन तुमच्या समोर येऊ द्यात. आहेत कां तुमच्याकडे तुमच्या देशासाठी १० मिनिटे? जर असतील तरच पुढे वाचा, पर्याय तुम्ही निवडायचा आहे.
तुम्ही म्हणता कि आपलं शासन तत्पर नाही.
तुम्ही म्हणता कि आपले कायदे खूप जुने आहेत.
तुम्ही म्हणता कि नगरपालिका कचरा उचलत नाही.
तुम्ही म्हणता कि दूरध्वनी काम करत नाहीत, आपल्याकडे रेल्वे हा एक विनोद आहे. हवाईमार्ग सेवा तर अत्यंत वाईट आहे, कोणतीही पत्र वेळेवर आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचत नाहीत.
तुम्ही म्हणता कि आपला देश हा एक कुत्र्याचे जेवण आणि एक मोठी कचराकुंडी आहे. तुम्ही म्हणता.... म्हणता आणि म्हणता......पण त्यासाठी तुम्ही काय करता?
समजा एक सिंगापूरला जाणारा प्रवासी आहे. त्याला "तुम्ही" हे नाव द्या. त्याला तुमचा चेहरा द्या. आता तुम्ही विमानतळाच्या बाहेर पडता आहात आणि तुम्ही अंतर राष्ट्रीयस्तरावरील उत्तम व्यक्ती आहात. सिंगापूर मध्ये तुम्ही रस्त्यावर सिगारेटचे थोटूक फेकत नाही आणि रस्त्यावर असलेल्या दुकानात खात पण नाही. तुम्हाला त्यांच्या इतकाच त्यांच्या जमिनीखालील रेल्वे चा अभिमान आहे. तुम्ही साधारणपणे संध्याकाळी ५ ते ८ च्या दरम्यान Orchard Road वरून (आपल्या माहीम कॉजवे किंवा पेडर रोड सारखा) वाहन चालविण्यासाठी $५ (अंदाजे रू. ६०/-) खर्च देता. जर तुम्ही एखाद्या उपहारगृहात किंवा खरेदीच्या मोठ्या दुकानात अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ थांबला असाल तर स्वतःचा हुद्दा किंवा स्वतःचे समाजातील स्थान याची ओळख करून न देता वाहनतळा मध्ये येऊन जास्तीचे तिकीट काढता. सिंगापूर मध्ये तुम्ही काही सुद्धा बोलत नाही. हो कि नाही?
दुबई मध्ये रमादानच्या महिन्यात सार्वजनिक ठिकाणी खाण्याची हिम्मत पण तुम्ही करणार नाही.
जेद्दाह मध्ये तुमच्या डोक्याला फडकं बांधल्याशिवाय तुम्ही बाहेर जाण्याची हिम्मत करणार नाही.
तुम्ही लंडन मध्ये दूरभाष केंद्रातील एखाद्या व्यक्तीला आपल्या एस टी डी आणि आय एस डी कॉल्स चे बिल दुसर्याच्या नावे पाठवण्याची व्यवस्था करण्यासाठी १० पौंड (अंदाजे रू. ६५०/-) लाच देण्याची हिम्मत करणार नाही.
तुम्ही washington मध्ये गाडी चालवताना ५५ मैल प्रती तास (८८ km /hr ) हा वेग न पाळण्याची हिम्मत करणार नाही आणि जर तो नपाळताना पकडले गेलात तर वाहतूक पोलीसाला तुला माहित नाही कां मी कोण आहे ते? मी अमक्या अमक्याचा मुलगा आहे. तुझे दोन पौंड घे आणि गप्प बस. असं बोलण्याची हिम्मत करणार नाही.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये तुम्ही नारळाच्या रिकाम्या करवंट्या कचराकुंडी शिवाय इतरत्र फेकायची हिम्मतच करणार नाही. टोकियोच्या रस्त्यावर तुम्ही तोंडातील पानाची पिंक कां टाकत नाही? बोस्टन मध्ये तुम्ही परीक्षेत कॉपी कां करत नाही, तसेच खोटी प्रमाणपत्रे पण कां मिळवत नाही? आपण अजुनही त्या तुम्ही या व्यक्ती विषयीच बोलत आहोत.
तुम्ही परदेशातील व्यवस्था पाळता त्यांचा आदर करता मग आपल्या देशातील व्यवस्थांच्या बाबतीत कां नाही? ज्या क्षणी तुम्ही भारताच्या भूमीवर पाय ठेवता त्या क्षण पासून कागद आणि सिगारेटची थोटक तुम्ही रस्त्यावर टाकायला सुरुवात कातरता. जर तुम्ही एका अनोळखी देशाचे मान्यवर नागरिक म्हणून वावरू शकता तर तेच तुम्ही भारत देशाचे कां नाही बनत?
एकदा एका मुलाखतीच्या वेळी मुंबईतील माजी महापालिका आयुक्त श्री Tinaikar यांनी एक मुद्दा मांडला होतं. "श्रीमंत लोकांची कुत्री रस्त्यावरून त्यांची अमूल्य अशी सामग्री सगळीकडे टाकत जातात." ते म्हणाले " आणि नंतर हेच लोक मागाहून अधिकाऱ्यांना दोष देतात कि ते तत्पर नाहीत, रस्ते घाण असतात. अधिकाऱ्यांकडून त्यांची अपेक्षा तरी काय आहे? प्रत्येक वेळी जेंव्हा त्यांच्या कुत्र्याला बहिर्दीशेला जायची इच्छा होईल तेंव्हा हातात झाडू घेऊन रस्त्यावर उतरावे काय? अमेरिका मध्ये प्रत्येक कुत्र्याच्या मालकाला त्याच्या कुत्र्याने शी केल्यावर ती ताबडतोब स्वच्छ करण्याचे नियमाच आहेत. अगदी जपान मध्ये सुद्धा तेच नियम आहेत. भारतीय नागरिक हे करतील काय?" त्यांचं बरोबर आहे. आपण सरकार निवडण्यासाठी मतदान करतो आणि नंतर आपल्या जबाबदारी पासून पळून जातो.
आपण मागे बसून लाड करून घेण्याची आणि शासनानेच सगळं करण्याची वाट बघत असतो, आणि आपला सहभाग केवळ नकारात्मकच असतो. आपण शासनाकडून स्वचातेची अपेक्षा करतो पण आपण रस्त्यावर कचरा टाकण्याचे कधीच थांबवणार नाही आणि रस्त्यावर पडलेला कागदाचा तुकडा उचलून कचऱ्याच्या टोपलीत कधीच टाकणार नाही. आपण रेल्वे कडून स्वच्छ अश्या स्वच्छतागृहांची अपेक्षा करतो पण आपण स्वच्छतागृहांचा योग्यरित्या वापर करायला कधीच शिकणार नाही. आपल्याला इंडिअन एअर लाईन्स व एअर इंडिया कडून उत्तम जेवण आणि स्वच्छतागृहांची अपेक्षा करतो पण आपण चोरी करण्याची एक सुद्धा संधी सोडणार नाही.
हे अगदी सेवक वर्गाला सुद्धा लागू आहे कि ज्यांना त्या सेवा सार्वजनिक करण्याची मुभा नाही. जेंव्हा आपल्या समोर मुली आणि स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार, हुंडाबळी या सारखे ज्वलंत प्रश्न येतात तेंव्हा आपण मोठ्याने त्यांचा सार्वजनिकरित्या निषेध व्यक्त करतो पण स्वतःच्या घरात त्याच्या बरोबर उलट वागतो. या मागचं आपलं कारण काय? "सगळी व्यवस्थाच बदलायला हवी. मी एकट्यानेच माझ्या मुलाचा हुंडा घेण्याचा हक्क कां सोडायचा? मी एकट्याने बदलून काय फरक पडणार?". मग, कोण बदलणार ही व्यवस्था? एखाद्या व्यवस्थे मध्ये नेमकं कोण असतं? अतिशय सोयीस्कररित्या या व्यवस्थे मध्ये आपण सोडून सगळे असतात. आपले शेजारी, इतर घरे, इतर शहरे, इतर समाज आणि शासन. पण तुम्ही आणि मी नक्कीच नाही.
पण जेंव्हा आपल्यावर काही सकारात्मक योगदान देण्याची वेळ येते तेंव्हा आपण आपल्या कुटुंबासह एका सुरक्षित कोशामध्ये स्वतःला बंदिस्त करून घेतो आणि दूर असलेल्या देशांकडे पाहतो. आणि कोणीतरी श्री सभ्य येतील आणि आपल्यासाठी त्यांच्या जादूच्या हातानी जादुई काम करतील याची वाट बघत बसतो किंवा आपण या देशाला सोडून आणि पळून जातो. एखाद्या आळशी माणसासारखे, एखाद्या कुत्र्याच्या भीतीने जीवखावून पळाल्यासारखे आपण अमेरिका या देशात जातो आणि त्यांच्या वैभवाचे, त्यांच्या व्यवस्थेचे गोडवे गायला लागतो. पण तेच न्यूयॉर्क जेंव्हा असुरक्षित बनते तेंव्हा आम्ही तिथून सुद्धा पळून जातो आणि इंग्लंड मध्ये येतो. जेंव्हा इंग्लंड मध्ये बेकारी अनुभवतो तेंव्हा आपण ताबडतोब पुढची विमानसेवा पकडून तिथून बाहेर पडतो गल्फ मध्ये जाण्यासाठी. जेंव्हा गल्फ मध्ये युद्ध होतं तेंव्हा आपण भारत सरकार कडून संरक्षणाची आणि परत स्वगृही आणण्याची मागणी करतो. प्रत्येकजण आपल्या देशाला दूषणे देणे आणि त्याचे वस्त्रहरण करणे एवढेच करतो. कोणी आपल्या व्यवस्थेला उर्जितावस्था आणण्याविषयी विचार करत नाही. आपलं मन, बुद्धी फक्त पैशाशी जोडलेली आहे.
प्रिय भारतीयांनो,
मी जे एफ केनेडी यांनी त्यांच्या अमेरिकेतील बांधवाना उद्देशून उच्चारलेल्या शब्दांचा भारतीयांच्या संदर्भात पुनरुच्चार करतो..........
" विचारा कि तुम्ही भारता साठी काय करू शकता?"
चला अश्या गोष्टी करू ज्यांची भारताला गरज आहे.
धन्यवाद!
डॉ अब्दुल कलाम

हा लेख खूपच विचार प्रवर्तक आहे आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज किती आहे तसेच एखाद्याच्या मनाला साद घालणारा आहे.